लोणी काळभोर, ता. 10 : पुणे शहर, जिल्हा ग्रामीण व पिंपरी चिंचवड शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला कोयता घेऊन फिरताना अटक केली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्यासा हॉटेल जवळून शनिवारी (ता.9) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कारवाई केली आहे. लोखंडी कोयत्यासह 20 हजार रुपयांची अॅटो रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
अभिजीत गोपीचंद दरेकर (रा. संभाजीनगर, कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अजिंक्य दिपक जोजारे (वय-30) यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत दरेकर हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर कायद्याचा वचक बसावा म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 56 प्रमाणे पुणे पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातून दोन वर्षाकरीता तडीपार केले होते.
तडीपार असताना सुद्धा अभिजीत दरेकर हा लोणी स्टेशन परिसरात कोयता बाळगून रिक्षातून फिरत आहे. अशी माहिती पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे यांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून अभिजीत दरेकरला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
दरम्यान, अभिजीत दरेकर याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142, 37(1) (2) (3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.