अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती: प्लांटमध्ये पार्टनर घेऊन त्यामधून येणारा नफा तुम्हाला देऊ असे खोटे नाटे सांगून विश्वास संपादन करत संगनमताने 1 कोटी 84 लाख 66 हजार 658 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता अशोक मेसे ( वय 48 वर्ष, व्यवसाय टेलरिंग, रा. स्वामी छाया फेज 2, फ्लॅट नं 19, विठ्ठल नगर, शिरूर, जि. पुणे) यांनी सुनिता राहुल भांगे, राहुल नवनाथ भांगे, ऋषी नवनाथ भांगे (रा. केसनंद रोड, वाघोली मूळ रा. अरणगाव, ता. केज, जि. बीड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, 1 ऑक्टोबर 2022 ते 18 मार्च 2025 दरम्यान सुनिता राहुल भांगे व राहुल नवनाथ भांगे, ऋषी नवनाथ भांगे (सर्व रा. केसनंद रोड, वाघोली मूळ रा. अरणगाव, ता. केज, जि. बीड) हे सविता मेसे यांच्या विठ्ठल नगर येथील घरी आले. तेथे येऊन सविता मेसे यांना भांगे हे वाटाणा सोलण्याचा व पनीर तयार करण्याचा प्लांट टाकणार आहेत. त्याकरिता आम्हाला पैशांची गरज आहे. तुम्ही आम्हाला पैसे दिले तर आम्ही तुम्हाला त्या प्लांटमध्ये पार्टनर घेऊ. त्यामधून येणारा नफा तुम्हाला देऊ, असे खोटेनाटे सांगून मेसे व मेसे यांच्या मैत्रीणीचा विश्वास संपादन करून संगनमताने एकूण 1 कोटी 84 लाख 66 हजार 658 रुपये एवढी रक्कम स्वत:च्या फायद्या करिता घेतली. आपली व आपल्या मैत्रीणीची आर्थिक फसवणूक केली. अशी तक्रार मेसे यांनी केली आहे.