पुणे: पुण्याला जाणाऱ्या ट्रेनमधील दोन परिचारिकांनी श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे बेशुद्ध पडलेल्या २८ वर्षीय तरुणीला प्रथमोपचार देऊन जीवनदान दिले आहे. जहांगीर रुग्णालयातील परिचारिका प्राजक्ता असुर्लकर आणि ज्योती सुल दौंड-पुणे डेमू ट्रेनमध्ये प्रवास करत असताना त्यांना एका तरुणीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने तरुणीला सीपीआर दिले, सीपीआर देऊन ट्रेन उरुळी स्टेशनवर पोहोचली तेव्हा परिचारिकांनी रुग्णवाहिका बोलावली, तरुणीच्या कुटुंबियांना घटनेची संपूर्ण माहिती दिली, तरुणीला उपचारासाठी उरळी येथील खाजगी रुग्णालयात रवाना करून वैद्यकीय पथकाला तिच्या प्रकृतीची माहिती दिली.
दौंड-पुणे डेमू ही दौंड रेल्वे स्थानकावरून पुण्याच्या दिशेने येत होती. सकाळी आठ वाजता गाडी यवत आणि उरळी स्थानकादरम्यान आल्यावर अचानक तरुणीला श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे ती बेशुद्ध पडली होती. प्राजक्ता आणि ज्योती यांच्या प्रसंगावधान तरुणीला जीवनदान मिळाले आहे. निःस्वार्थ कृतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.