लोणी काळभोर, ता.18 : हडपसर-सासवड मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना फुरसुंगी (ता. हवेली) पावर हाऊस समोर रविवारी (ता. 16) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
सुरज शरद धायडे (वय 23) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुरजचा भाऊ आकाश शरद धायडे (वय 19, दोघेही रा. पावर हाऊस, फुरसुंगी फाटा ता. हवेली) याने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकावर भारतीय न्याय संहिता कलम 281, 106 सह मोटार वाहन कायदा कलम 184, 134, 119/177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश याचा भाऊ सुरज हा मोपेड गाडीवरून रविवारी रात्री चालला होता. हडपसर-सासवड रस्त्यावरून घरी येत असताना फुरसुंगी पावर हाऊस समोर त्याच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. आणि अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला.
अज्ञात वाहनचालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवुन, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून सुरज चालिवत असलेल्या मोपेड गाडीस जोरदार धडक दिली. व या अपघातामध्ये सुरजच्या डोक्यास गंभीर जखमी करुन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. अशी फिर्याद आकाश यांने फुरसुंगी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक तेहसीन बेग करीत आहेत.