पुणे : पंतप्रधान आवास योजनेसाठी शहराच्या विविध भागातील प्रकल्पांसाठी साडेचार चार हजार अर्ज महापालिका प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. पुणे महापालिका प्रशासनाकडुन शहरातील पाच ते सहा भागांमध्ये ४ हजार १७३ घरे बांधण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडुन पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना कमी खर्चात हक्काचे घर मिळावे, यासाठी संबंधित योजना सुरू करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेने या योजनेची अंमलबजावणी करून पहिल्या टप्प्यात वडगाव बुद्रुक, खराडी, हडपसर या भागात २ हजार ९१८ घरे बांधून त्यांचे वितरण केले. या योजनेअंतर्गत ३०० फुटांचे घर आर्थिक दुर्बल ‘घटकातील नागरिकांना देण्यात येते. दरम्यान, सप्टेंबर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना-२’ची घोषणा केली. योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची देखील महापालिकेने अंमलबजावणी केली.
त्यानुसार, दुसऱ्या टप्प्यात महापालिका प्रशासनाने धानोरी, हडपसर, कोंढवा, बालेवाडी, वडगाव खुर्द, बालेवाडी या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ४ हजार १७३ घरे उभारण्याचे जाहीर केले. त्यानुसार, आर्थिक दुर्बल घटकातील नागरीकांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्जही मागविण्यात आले. त्यानुसार आत्तापर्यंत ४ हजार ६६६ इतके अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले आहे. या घरांसाठी सुमारे ३०० कोटी रूपये इतका खर्च महापालिका प्रशासनाला येणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.