यवत, (पुणे) : दरोडा टाकून कुटुंबीयांना दगड, काठ्यांनी बेदम मारहाण करून एकाचा खून करणाऱ्या 4 परप्रांतीय टोळीला स्थानिक गुन्हे व यवत पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या आत अटक केले आहे. यवत (ता. दौंड) रेल्वे स्टेशन परिसरातील निळकंठेश्वर मंदिराजवळ बुधवारी (ता. 05) रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली होती.
सलमान दिलशाद शेख (वय-28), मोमीन अकबर शेख, (वय-85), गवतसिंग चौधरी जगदेवसिंग तोमर (वय-26), गुलशन उर्फ मोठा जहांगीर खान (वय -25, रा. सर्वजण बागपत, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सहकारनगर परिसरात निळकंठेश्वर मंदिराजवळ राहणाऱ्या विश्वजीत शशीकांत चव्हाण यांच्या घरी तीन दरोडेखोरांनी अनधिकृतरित्या प्रवेश केला होता. यावेळी घरातील चार सदस्यांना मारहाण केली. घरातील सोन्याचे दागिने लुटण्यात आले. या हल्ल्यात विश्वजीत चव्हाण (वय-33) यांचा मृत्यू झाला, तर अन्य सदस्य गंभीर जखमी झाले.या घटनेनंतर तत्काळ यवत पोलीस स्टेशनमध्ये कलम १०३, १०९, ३३३, ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी यवत पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना तातडीने तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. प्रत्यक्षदर्शींनी आरोपी रेल्वे रूळाच्या दिशेने पळून गेल्याचे सांगितले. घटनास्थळाजवळील एका झोपडीत संशयास्पद साहित्य आढळले, ज्यावर ‘युनिव्हर्सिटी दिल्ली’ असा उल्लेख होता. गुप्त माहितीच्या आधारे दोन संशयित पुणे स्टेशन परिसरात आढळले आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली बाजूकडे जाणाऱ्या रेल्वे तसेच ट्रॅव्हल्स स्टॉपवर आरोपींचा शोध घेत असताना बेस्वडा परिसरातील गुंजन थेटर चौकातील ट्रॅवाल्स स्टॉपवर दोन संशयित इसम मिळून आले. नाव पत्ता विचारला असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता. गुलशन उर्फ मोठा जहांगीर खान याच्या मदतीने वरील गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि यवत पोलीस स्टेशनचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तपास पथकात सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, दत्ताजीराव गावडे, कुलदीप संकपाळ, प्रवीण सपांगे, सुवर्णा गोसावी, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, पोलीस हवालदार रामदास बाबर, विजय कांचन व त्यांच्या पथकाने केली आहे. जलद तपास करून आरोपींना आतक केल्याने पोलिसांचे परिसरात कौतुक केले जात आहे.