कणकवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याला सुरुवात झाली. आज पाहिल्याच दिवशी सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे राज ठाकरे बैठकीला उपस्थित राहिलेच नाहीत. यामुळे मनसेतील पदाधिकाऱ्यांची अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पदाधिकाऱ्यांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैठकीच्या नियोजनात पदाधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला. अनेक पदाधिकाऱ्यांना बैठकीचे निरोप देखील मिळाले नाहीत. त्यामुळे अनेक बैठकीला पोहचू शकले नाहीत. पदाधिकाऱ्यांनी घातलेल्या घोळामुळे राज ठाकरे यांनी बैठकीकडे पाठ फिरवली.
जमलेल्या पदाधिकाऱ्यांची बैठक मनसे नेते बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई यांनी घेतली. यावेळी मनसेमध्ये अनेकांना काम करायची इच्छा आहे. मात्र पदाधिकाऱ्यांच्या गोंधळामुळे शक्य होत नसल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
पदाधिकाऱ्यांच्या गोंधळामुळे अनेक कार्यकर्ते इच्छा असून देखील येऊ शकत नाहीत. ही बाबा पक्षप्रमुखांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे कुठेतरी निर्णय घ्यावा लागेल आणि त्या निर्णयापर्यंत ते आज पोहचले आहेत. आजच्या झालेल्या प्रकाराने पुढील एक ते दोन दिवसात सिंधुदुर्गची मनसे कार्यकारणी बरखास्त होण्याची शक्यता असल्याचे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.