मुंबई: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या मंत्रिपदावर ओबीसीचें ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट होत आहे. या मंत्रिपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील चार आमदारांच्या नावांची चर्चा करण्यात येत आहे.
बीड या एकाच जिल्ह्यात भाऊ-बहिणीला मंत्रिपद देण्यात आले होते. आता हा असमतोल दूर करण्याची संधी अजित पवार यांना प्राप्त झाली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते भुजबळ यांची वर्णी लागण्याची चर्चा करण्यात येत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लावण्याबद्दल अनुकूल असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या अजित फ्चार यांच्यावर टीकाटिप्पणी केल्याबद्दल पवार हे भुजबळ यांच्याबद्दल नाराज आहेत. त्यामुळे पवार हे त्यांच्या नावाला अनुकूल प्रतिसाद देत नसल्याची माहिती मिळत आहे.
आता मंत्रिपदासाठी माजी मंत्री संजय बनसोडे, प्रताप पाटील-चिखलीकर, ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके आणि सतीश चव्हाण यांची नावे आघाडीवर आहेत. परंतु, अजित पवार यांच्या मनात कोणाचे नाव आहे, हे त्यांनी अद्याप कुठेही उघड केले नाही. मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे खाते आता पवार हे सांभाळत आहेत.