अमृतसर: शिवसेना नेत्याची गोळ्या घालून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात एक मुलगा देखील जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत्यू झालेले मंगत राय ऊर्फ मांगा हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मोगा जिल्ह्याचे अध्यक्ष होते, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
52 वर्षीय मंगत राय हे रात्री 10 वाजण्याच्या सुमारास किराणा सामान खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले होते. यावेळी अचानक त्यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. मांगा यांच्यावर झाडलेली गोळी त्यांना न लागता जवळून जात असलेल्या एका 12 वर्षांच्या मुलाला लागली असेही पोलिसांनी सांगितले. त्यानंतर मांगा हे दुचाकीवरून घटनास्थळावरून पळून गेले, मात्र हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला.
पाठलाग करताना हल्लेखोरांनी मंगत राय यांच्यावर गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये त्यांना गोळी लागली. यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले. मांगा यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले जेथे त्यांना डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आले. शिवसेना नेत्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, सहा आरोपी आणि काही अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार सध्या तपास सुरू आहे, असे पोलीसांनी सांगितले.