नवी दिल्ली: देशाच्या राजधानी दिल्लीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे खासगी विमान कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेचे मेदांता रुग्णालयात लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. महिला व्हेंटिलेटरवर असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्याने तिचे लैंगिक शोषण केले, अशी तक्रार महिलेने केली आहे. ही घटना 6 एप्रिल रोजी घडल्याचे तिने सांगितले आहे. त्यानंतर तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासगी विमान कंपनीत काम करणारी एक महिला या महिन्याच्या सुरुवातीला राजधानी दिल्लीतील मेदांता रुग्णालयात दाखल झाली होती. तिला व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. ही घटना 6 एप्रिलला घडली असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. महिलेला रुग्णालयातून 13 एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आला आहे. या बाबत सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही महिला गुडगाव या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आली होती. त्यानंतर ती एका हॉटेलमध्ये राहात होती. स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना घटना घडल्या नंतर तिला श्वास घेणेही कठीण झाले होते. त्यानंतर या महिलेला गुडगावच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर 6 एप्रिल रोजी लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
शोषण झाले त्यावेळी दोन परिचारिकाही उपस्थित
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, मेदांता रुग्णालयात तिला 6 एप्रिल 2025 रोजी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यावेळी रुग्णालयातला एक कर्मचारी आला आणि त्याने तिचे लैंगिक शोषण केले. तिने सांगितल्यानुसार, घटना घडत असताना मी बोलू शकले नाही किंवा बचावासाठी आरडाओरडाही करु शकले नाही कारण मी पूर्ण शुद्धीत नव्हते. मी स्विमिंग पूलमध्ये आपण बुडले असतो तर? या भीतीने मी घाबरले होते. अशा अवस्थेत मी रुग्णालयात दाखल असताना माझे शोषण करण्यात आले. ज्यावेळी शोषण झाले त्यावेळी दोन परिचारिकाही उपस्थित होत्या, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. महिलेला डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या नवऱ्याला सांगितला. त्यानंतर सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेचा जबाब मॅजिस्ट्रेटसमोर नोंदवून घेतला आहे. याबाबत रुग्णालयात जाऊन पोलीस तपास करत आहेत. तसेच आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.