कर्नाटक: कर्नाटकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या हंपीमध्ये देश व विदेशी पर्यटकांवर मारहाण करण्यात आली असून त्यातील इस्रायली महिलेसह अन्य दोन महिलांवर सामुहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या तीन पुरुषांना नदीत फेकून देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अधिक माहिती अशी की, गुरुवारी (6 मार्च) ला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कर्नाटकातील सनापूर तलावाजवळ ही विकृत घटना घडली आहे. नराधम आरोपींनी 27 वर्षीय इस्रायली महिला आणि 29 वर्षीय होमस्टे चालविणाऱ्या महिलेवर लैंगिक अत्याचार केला आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेल्या तीन पुरुषांना मारहाण करत पाण्यात फेकण्यात आले. त्यानंतर ओडिशाच्या एका पर्यटकाचा मृतदेह नदीच्या पाण्यात आढळला आहे. तर अमेरिका आणि महाराष्ट्रातील दोन पर्यटक देखील जखमी अवस्थेत आढळले.
पोलिसांनी नोंदविलेल्या एफआयआरनुसार, कर्नाटक येथील हम्पी मंदिर पाहायला पर्यटक गेले होते. तिथे ते एका ठिकाणी वास्तव्यास थांबले. चार पर्यटक आणि एक होम स्टे संचालिका सनापूर तलावाजवळ मौजमस्ती करत होते. तेंव्हा तेथे तीन जण दुचाकीवरून आले. त्यानंतर त्यांनी पेट्रोल पंप कुठे आहे असे विचारले. होम स्टे संचालिकेने इथे नाहीये, असे सांगितले. त्यानंतर आरोपी पर्यटकांकडे पैसे मागू लागले. पर्यटकांनी या लोकांना पैसे देण्यास नकार दिला असता त्यांनी कन्नड आणि तेलगू भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर तीन पुरुष पर्यटकांना नदीत ढकलुन नराधमांनी दोन महिलांवर लैंगिक अत्याचार केला.
पोलिस बेपत्ता पर्यटकांचा शोध घेत होते, त्यानंतर एक मृतदेह आढळला आहे. पोलिस तपास करत आहेत.