नवी दिल्ली: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी परिषदेने मोठ्या खरेदी प्रस्तावांना मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव एकूण 54000 कोटी रुपयांहून अधिक मूल्याचा आहे. टी 90 टॅंक खरेदीमुळे भारतीय लष्कराच्या सामर्थ्यात वाढ होणार आहे.
भारतीय लष्करासाठी सध्या वापरात असलेल्या 1000 हॉर्सपॉवर इंजिनच्या जागी 1350 हॉर्सपॉवर इंजिन खरेदीस संरक्षण अधिग्रहण परिषदने मंजुरी दिली आहे. इंजिन टी-90 रणगाडा (टॅंक) अद्ययावत रूपातील असून, त्यामुळे विशेषतः डोंगराळ भागातील लढाईदरम्यान टँकची शक्ती आणि कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल, असे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
टी-90 हा एक आधुनिक मुख्य युद्ध रणगाडा आहे, जो रशियाच्या यूरॉलव्हॅगानझावोद या कंपनीने विकसित केला आहे. भारतीय लष्कराने या टॅंकला टी-90 भीष्म असे नाव दिले आहे. हा टॅंक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, शत्रूच्या रणगाड्यांविरोधात आणि विविध भौगोलिक परिस्थितीत युद्ध करण्यासाठी सक्षम आहे.