मोहाली: पंजाबमधील मोहाली येथील मोमोस कारखान्यावर आरोग्य अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यामुळे एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. मोहाली, चंदीगड आणि पंचकुला येथील विविध आऊटलेट्सना मोमोज आणि स्प्रिंग रोलचा पुरवठा करणाऱ्या कारखान्याने त्यांच्या मोमोस उत्पादनांमध्ये अस्वच्छ आणि अस्वीकार्य पदार्थ आणि मांसाचा वापर केल्याचे आढळून आले. छाप्यादरम्यान, आरोग्य अधिकाऱ्यांना कारखान्याच्या रेफ्रिजरेटरमध्ये कुत्र्याचे डोके, 50 किलो कुजलेले मांस, क्रशर मशीन आणि कुजलेल्या भाज्या सापडल्या. कारखान्यात बनवण्यात आलेल्या पदार्थामध्ये सडलेल्या भाज्या वापरत असल्याचेही अधिकाऱ्यांना आढळून आले. मोहालीच्या गायतोर गावात असलेला हा कारखाना गेल्या दोन वर्षांपासून काही लोक चालवत होते. कारखान्यात 10 कामगार कर्मचारी काम करत होते, दरम्यान, कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य अधिकारी येताच तेथून पळ काढला.
अहवालानुसार, कारखान्यात अज्ञात स्त्रोतांकडून मांस आणण्यात येत होते आणि कामगार अस्वच्छपणे मांस वापर असल्याचेही उघडकीस आले आहे. अधिका-यांना असेही आढळून आले की, कारखाना योग्य अन्न सुरक्षा प्रोटोकॉल पाळत नाही आणि उत्पादने अत्यंत अस्वच्छ ठिकाणी तयार केली जात आहेत.
दरम्यान,हा भयंकर प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक रहिवाशांना धक्का बसला आहे. या कारखान्याने ज्या ज्या आऊटलेट्सना मोमोज आणि स्प्रिंग रोलचा पुरवठा केला असेल. त्या भागात अनेकांनी कुत्र्याच्या मांसापासून बनवलेले मोमो किंवा स्प्रिंग रोल खाल्ले असतील. कारखानदार आणि कामगारांवर कडक कारवाई करू, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, याची काळजी घेऊ, असे आश्वासन आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहे.
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले मांस आणि इतर घटक देखील चाचणीसाठी पाठवले आहेत आणि कारखान्याने वापरलेल्या घटक किती घातक होते हे तपासण्यासाठी चाचणीच्या निकालाची वाट पहात आहेत. दरम्यान, स्थानिक रहिवाशांना बाहेर मोमो आणि स्प्रिंग रोल खातांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी रहिवाशांना खाद्य आस्थापनांमध्ये कोणत्याही संशयास्पद प्रकार किंवा अस्वच्छता आढळून आल्यास ताबडतोब अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.