बंगळुरू : बंगळुरू येथे एका पुण्याच्या तरुणीची तिच्या आयटी इंजिनिअर नवऱ्याने निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. हत्या केल्यानंतर आरोपी पती पीडितेचा मृतदेह बॅगेत भरून घटनास्थळावरून पळून गेला. गौरी खेडेकर असं हत्या झालेल्या विवाहित तरुणीचं नाव आहे. तर राकेश खेडेकर असं आरोपीचं नाव आहे. यानंतर गुरुवारी रात्री आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र याप्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
धक्कादायक माहिती आली समोर
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीनं आपल्या पत्नीला भोसकल्यानंतर ती जिवंत असतानाच त्याने तिला सुटकेसमध्ये भरलं.अशी नवी माहिती समोर येत आहे. आरोपीनं पत्नीवर हल्ला केल्यानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. यानंतर ती हळूहळू बेशुद्ध पडत होती. याच वेळी आरोपीनं ती जिवंत असताना तिचे हातपाय दुमडून तिला सुटकेसमध्ये भरलं असावं, अशी माहिती फॉरेन्सिक तपासातून समोर आली आहे.
रात्रभर तो तिच्या मृतदेहाशी बोलत…
पोलिसांनी आरोपीची केलेल्या चौकशीत, गौरीची हत्या केल्यानंतर रात्रभर तो तिच्या मृतदेहाशी बोलत बसला होता, असा दावा खुद्द राकेशने केला आहे. मात्र या दाव्यात तथ्य नसल्याचं पोलिसांचं म्हणण आहे. हत्या केल्यानंतर तो घराबाहेर पडला होता.