मुंबई: सध्याच्या घडीला राज्यात महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून रान पेटले आहे. पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये झालेल्या अत्याचार घटनेमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षा चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे पोलीस नेमके काय करतात असा प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात आहे. तसेच अत्याचार घटनेबाबत महायुतीच्या मंत्र्यांनी केलेली वक्त्यव्यांमुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. यामधून सरकार सवारण्याचा प्रयत्न करत असतानाच आता भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याचा एक कारनामा समोर आला आहे. या मंत्र्यांने स्वत:चे विवस्त्र फोटो एका महिलेला पाठवल्याने महाराष्ट्र्रात खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेने मंत्र्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दैनिक सामनात आलेल्या वृत्तानुसार मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो एका महिलेला पाठवले आहेत. हे प्रकरण त्या महिलेने स्वतः उघड केले आहे. तसेच आपला काहीही संबंध नसताना फक्त बदनाम करण्यासाठी मंत्री गोरे त्रास देत असल्याचे त्या महिलेने म्हटले आहे.
याबाबत सदर महिलेने थेट राज्यपालांना पत्र पाठवले आहे. तसेच मंत्रिमंडळातील एक मंत्री त्रास देत असून त्याची हकालपट्टी करावी, असे जयकुमार गोरे यांचे नाव घेत मागणी पत्रातून केली आहे. तसेच महायुती सरकारने याबाबत योग्य ती कारवाई न केल्यास 17 मार्चपासून विधान भवनासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा महिलेने दिला आहे.
राज्यपालांना पाठवलेल्या पत्राची एक प्रत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनाही पाठवण्यात आली आहे. या पत्रात पीडित महिलेने संपूर्ण घटनाक्रमाने नमूद केल्या आहेत. तसेच या महिलेने आपण सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असल्याचा देखील दावा केला आहे.
जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण-खटावचे आमदार असून त्यांनी 2016 पासून फक्त सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असल्यानेच आपल्याला त्रास दिल्याचे म्हटले आहे. त्रास देण्यासाठी जयकुमार गोरे यांनी त्यांचे नग्न फोटो व्हॉट्सॲपवर पाठवले, असेही त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद झाला आहे. पण अटक टाळण्यासाठी आमदार गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी त्यांचा अटकूपर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक देखील झाली होती. गोरे यांना दहा दिवस तुरुंगात राहावे लागले होते असे, या पत्रातून म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणात गोरे यांचा त्रास वाढतच गेल्याने या बदनामीविरोधात महिलेने जिल्हाधिकाऱ्यांना भेटून कारवाईची मागणी केली होती. त्यावेळी मात्र कारवाई करण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांकडून पोलीस अधीक्षकांकडे बोट दाखवण्यात आले.
दहा दिवस तुरुंगात राहून आलेल्या जयकुमार गोरेंनी याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयात माफीनामा दिला होता. मात्र, आता पुन्हा त्रास दिला जात आहे, अशीही महिलेने केली आहे. तसेच 2016 मधील दाखल केलेली तक्रार व्हॉट्सॲपवर 2025 पासून व्हायरल करण्यात येत असल्यामुळे आपले नाव आता उघड झाल्याचेही संबंधित महिलेने म्हटले आहे. तसेच आपल्यावर दबाव आणण्यासाठी दोन कोटींची खंडणी मागितल्याची खोटी तक्रार मंत्री जयकुमार गोरे यांनी पीए अभिजित काळेमार्फत केल्याचा दावाही पीडितेने पत्रात केला आहे.