मुंबई: विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी २७ मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांना उमेदवारी घोषित केली आहे. संजय खोडके हे विदर्भातील राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत.
संजय खोडके हे विदर्भातील पक्षाचे मोठे नेते असून ते आमदार सुलभा खोडके यांचे पती आहे. त्यामुळे आगामी काळात विधान भवनात पती-पत्नी आमदार पाहायला मिळणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी अनेक नावांची चर्चा होती. यामध्ये झिशान सिद्दकी, संजय दौंड, उमेश पाटील, संजय शिंदे, दिपक मानकर आणि संग्राम कोते पाटील यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा होती. परंतु, ही चर्चेतील नावे मागे टाकत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय खोडके यांना उमेदवारी दिली आहे.