मुंबई: ‘मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार’ हे पद निर्माण करून तेथे सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करत यापुढे अर्थ खात्याच्या सर्वच धोरणात्मक आणि पर्यायाने सर्वच प्रशासकीय निर्णयात आपला वरचष्मा राहील, याची सोय मुख्यमंत्र्यांनी केल्याचे मानले जाते. फडणवीस यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू असून, त्यांनी राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना चाप लावल्याचे मानले जाते. विशेषतः अजित पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंच्या खात्यांपाठोपाठ आता अजितदादांच्या अर्थ खात्यातसुद्धा घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना आदी लोकप्रिय योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडला असून यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. राज्याची आर्थिक घडी पुन्हा व्यवस्थित बसवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी परदेशी यांची मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. परदेशी हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात, ते सध्या ‘मुंबई हेरिटेज कन्झर्व्हेशन कमिटी’ आणि ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अजित पवारांकडे असलेल्या अर्थ खात्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि राज्याची बिघडलेली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या नियुक्तीचा निर्णय घेतला आहे.
राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे पाशवी बहुमत असलेले सरकार असले, तरी सत्तेत तीन पक्ष असल्याने निधी वाटपावरून कुरकुर सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाने अमित शाह यांच्याकडे अजित पवारांकडे असलेल्या अर्थ खात्याची तक्रार केली आहे. शिंदेंचे आमदार, मंत्री यांनीही यासंदर्भात भाष्य केलेले आहे.