नवी दिल्ली: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या 10 दिवसांच्या रेल्वे टूरची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह वेव्स समिट 2025 ला हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह विविध ऑडिटोरिअम्सची पाहणी केली. त्यानंतर एकत्र पत्रकार परिषद घेत राज्यातील रेल्वे प्रकल्पाबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत.
अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रात 1 लाख 73 हजार कोटींची कामे सुरू आहेत. मुंबईसह इतर ठिकाणी 17 हजार कोटींची कामे सुरू आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राज्यात गडकिल्ल्यांना व ऐतिहासिक ठिकाणांना जोडणारी रेल्वेची आयकॉनिक टूर सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
राज्यात छत्रपती शिवाजी महाराज या नावाने सर्किट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये सुशोभनीय, सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे सुरू होईल. या रेल्वेच्या माध्यमातून 10 दिवसांची टूर केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, इतर ऐतिहासिक ठिकाणे, तसेच त्यांच्याशी संबंधित इतर सांस्कृतिक स्थळांना ही रेल्वे जोडणार आहे.
1 लाख 73 हजार कोटी रुपये…
यासाठी, 1 लाख 73 हजार कोटी रुपये केंद्र सरकार रेल्वेच्या पायाभूत सोईसुविधांवर खर्च करत आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानाकांच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले आहे. महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या स्थानकांचं वर्ड क्लास ट्रान्स्फर्मेशन होत आहे. यावर्षी 23 हजार 700 कोटी रुपये रेल्वे अर्थसंकल्पात मिळाले आहेत. युपीएच्या दहा वर्षांत 10 हजार कोटी रुपये एकत्रितपणे मिळाले नाहीत. पण, आता दरवर्षी 23 हजार ते 25 हजार कोटी मिळाले आहेत. अशी माहितीदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.