मुंबई: महाराष्ट्र हे देशात सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेले राज्य आहे. उद्योग धंद्यापासून ते शेती, सेवा क्षेत्र व आरोग्य सुविधा यामध्ये राज्य अग्रेसर आहे. पायाभूत सुविधांचा विकास देशात सर्वाधिक महाराष्ट्रामध्येच आहे. कुठल्याही क्षेत्रात सेकंड टू नन नसलेल्या महाराष्ट्राला अधिकाधिक उत्तम राज्य बनवण्याची ग्वाही देत विरोधकांनी राज्यकारभारासाठी आपल्याकडील चांगल्या सूचना देण्याची अपेक्षाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केली. राज्यात ग्रामीण भागातील १ ते ४ हजार लोकसंख्या असलेल्या गावांत १४ हजार किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे बांधण्यात येतील, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या उत्तरादरम्यान मुख्यमंत्री बोलत होते. फडणवीस म्हणाले, ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून गावांना जोडणारे रस्ते यापुढे सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार आहेत. राज्यात ग्रामीण भागातील १४ हजार किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार आहेत. तसेच १ हजार लोकसंख्या असलेल्या सुमारे ४ हजार गावांमध्ये सिमेंट काँक्रीटीकरणाचा प्रकल्प राबवण्यात येईल. न्यू डेव्हलपमेंट बँकेला याबाबत अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यावर निश्चितच सकारात्मक निर्णय होणार आहे. राज्य सरकारने ‘सूर्यघर मोफत वीज योजना’ प्रभावीपणे राबवून देशभरात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत १ लाख ३० हजार घरांवर रूफटॉप सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. त्यासाठी १००० कोटींपेक्षा अधिक अनुदान दिले आहे. राज्यातील नागरिकांना वीजबिलमुक्त करण्याचा संकल्प घेत शासन सौरऊर्जेला गती देत आहे. आगामी पाच वर्षात वीज दर २४ टक्क्यांनी कमी होणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसह विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत १.१३ लाख कोटी रुपयांची बचत होणार आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला देशात सर्वाधिक २० लाख घरांची मंजुरी दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून अतिरिक्त ५० हजार असे एकूण २ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळेल.