मुंबई : राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर सार्वजनिक व्यासपीठावर एकत्रित येण्यास टाळाटाळ करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काका-पुतणे मागील काही दिवसांपासून मात्र विविध कार्यक्रम, बैठकांच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येताना दिसत आहेत. आता २१ एप्रिलला शेतीमधील एआय तंत्रज्ञानाच्या वापरासंबधी चर्चा करण्यासाठी पुण्यातील साखर संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस ते एकत्र येणार आहेत. अशा प्रकारे व्यासपीठावर एकत्र येण्याची ही त्यांची तिसरी वेळ असणार आहे.
दहा दिवसांच्या कालावधीत या तीन भेटी होत आहेत. याआधी साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत आणि त्यानंतर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र आले होते. या भेटींच्या निमित्ताने दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील राजकीय दुरावा काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. मूळ राष्ट्रवादी पक्षाची दोन शकले झाली असली, तरी दोन्ही राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांकडून शरद पवार हेच आपले दैवत असल्याचा दावा केला जातो. अजित पवार यांनीही पुण्यातील एका कार्यक्रमात आपण शरद पवार यांना कालही दैवत मानत होतो आणि आजही दैवत मानतो, असे वक्तव्य केले होते.