मुंबई: गोवंडीतून बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे घरात कोणी नसल्याची संधी साधून जन्मदात्या पित्यानेच 13 वर्षीय मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला व आरोपीला अटक केलं आहे.
अधिक माहिती अशी की,पीडित मुलगी कुटुंबियांसोबत राहत होती. परिसरातील जवळच्या शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. पीडित मुलीची आई घरात नसल्याची संधी साधत आरोपी पित्याने वारंवार मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. घडलेल्या प्रकाराबाबत कुणाकडे वाच्चता केल्यास ठार मारण्याची धमकी आरोपी पित्याने पीडित मुलीस दिली होती.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अचानक पीडित मुलीच्या पोटात दुखू लागले. त्यानंतर तिच्या आईने तिला जवळच्या डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यानंतर हा बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी पित्यास अटक केली आहे.