नवी मुंबई : लहान मुलाने रस्त्यावर शौच केल्याच्या किरकोळ कारणावरून एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या दाम्पत्यासह त्यांच्या ९ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बेलापूर गावातील स्मशानभूमीलगतच्या पंचशील नगर झोपडपट्टीत घडली आहे. या हल्ल्यात ९ महिन्यांच्या बाळासह त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नेरूळमधील डी. वाय. पाटील रुग्णालय उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर एनआरआय पोलिसांनी हल्लेखोर व्यक्ती राजू सट्टाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. या घटनेत जखमी झालेल्यांमध्ये अंजली खंदारे ऊर्फ अंजली उस्मान मोह शेख (वय-३७), तिचा पती उस्मान शेख (वय-४०) आणि ९ महिन्यांचा मुलगा अफान या तिघांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शेख दाम्पत्य आपल्या दोन मुलांसह बेलापूर गावातील स्मशानभूमीलगतच्या पंचशील नगर झोपडपट्टीत राहतात. शेख दाम्पत्याचा २ वर्षीय मुलगा अयान याने गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर शौच केले होते. यामुळे त्यांच्या शेजारी राहणारा राजू सट्टा याला राग आल्याने त्याने शेख दाम्पत्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर त्याने सळई व कुऱ्हाड घेऊन शेख दाम्पत्याच्या घरात घुसून दोघांवर हल्ला केला. त्यानंतर त्याने अंजलीच्या हातातील ९ महिन्यांचा मुलगा अफान याच्या डोक्यातही कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही जखमी झाल्यानंतर राजूने पलायन केले. तिघा जखमींना नेरूळमधील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर एनआरआय पोलिसांनी राजूविरोधात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.