नवी दिल्ली : तरुण नोकरीला, व्यावसायिक जीवनाला सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या दैनंदिन शारीरिक हालचाली आणि झोपेत मोठी घट होत असल्याचे केम्ब्रिज विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात समोर आले आहे. जे तरुण जास्त शारीरिक हालचाल करतात ते बस चालवणे, हेअर ड्रेसिंग, सफाई, उत्पादन, तांत्रिक अशा नोकरीपेशात असतात. याउलट, व्यवस्थापकीय किंवा व्यावसायिक पदांवर असलेल्या लोकांच्या शारीरिक हालचाली कमी असतात.
जे लोक घरूनच काम करतात त्यांच्या शारीरिक हालचालींमध्ये सर्वात मोठी घट आल्याचे दिसून आले. मात्र त्यांच्या झोपेच्या वेळेत कोणताही बदल झाला नाही, अभ्यासात असे आढळून आले. नोकरी सुरू केल्यानंतर सुरुवातीला शारीरिक हालचाल वाढते; परंतु कालांतराने ती लक्षणीयरीत्या कमी होते.
आपल्याला आयुष्यभर निरोगी राहायचे असेल तर सक्रिय राहणे महत्त्वाचे आहे. असे विद्यापीठातील मेडिकल संशोधकांना असे आढळून आले की, तरुण आणि प्रौढांची झोप प्रत्येक रात्री कमी होत जाते. तरुणांमध्ये आहार, शारीरिक हालचाली आणि झोप यासारख्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी संशोधकांनी आग्रह धरला आहे. यामुळे कर्मचारी कमी आजारी पडतील तसेच त्यांच्या आजारी सुट्या घेण्याचे प्रमाण सुद्धा कमी होईल.
रिसर्च कौन्सिल (एमआरसी) एपिडेमियोलॉजी युनिटच्या अलेना ऑक्सेनहॅम यांनी सांगितले. जे लोक घरात राहून काम करतात त्यांनी त्यांच्या शारीरिक हालचाली वाढवल्या पाहिजे. कामाच्या आधी किंवा नंतर तसेच दुपारच्या जेवणाच्या वेळेस थोडे फिरायला पाहिजे असा सल्ला ऑक्सेनहॅम यांनी दिला आहे.
या अभ्यासात १६ ते ३० वर्षे वयोगटातील ३,००० हून अधिक लोकांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले. या सर्वांनी २०१५ ते २०२३ दरम्यान पहिल्यांदाच नोकरी सुरू केली होती. इंटरनॅशनल जर्नल ऑफ बिहेवियरल न्यूट्रिशन अँड फिजिकल अॅक्टिव्हिटीमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार काम सुरू केल्यानंतर सरासरी २८ मिनिटांच्या मध्यम हालचाली होतात मात्र नंतर या हालचाली कमी होत जातात.