पती-पत्नीचे नाते हे प्रेमाचे, तितकेच विश्वासाचे असते. विश्वास हा कोणत्याही नात्याचा सर्वात मजबूत पाया असतो. जेव्हा हा विश्वास तुटतो तेव्हा त्याचा परिणाम व्यक्तीला भावनिकरित्या तोडतो. विशेषत: जेव्हा तुमचा जोडीदार गुप्तपणे कर्ज घेतो किंवा तुम्हाला न कळवता पैसे कुठेतरी गुंतवतो. तेव्हा वाद न घालता बाजू ऐकून स्पष्टपणे योग्य भूमिका मांडण्याचा प्रयत्न करा.
या अशा प्रकारांमुळे नात्यात तणाव आणि दुरावा निर्माण होतो, त्यामुळे पुन्हा विश्वास निर्माण करणे कठीण होते. परंतु, दोन्ही जोडीदारांनी एकत्रितपणे परिस्थिती समजून घेतली, भावनांवर नियंत्रण ठेवले आणि प्रामाणिकपणे बोलले तर विश्वास दृढ होऊ शकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला आर्थिक कारणांमुळे तुमच्या जोडीदारापासून वेगळे वाटू लागले असेल, तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
पती-पत्नीमधील विश्वास पुन्हा कसा निर्माण करायचा हा जर प्रश्न निर्माण होत असेल तर तुमचा पार्टनर तुम्हाला न सांगता कर्ज घेतो किंवा कुणाला देतो, तर पहिली पायरी म्हणजे तुमच्या भावनांना आवर घाला. रागाने प्रतिक्रिया दिल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते. तुम्हाला परिस्थिती समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, जेणेकरून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. तुमच्या जोडीदाराने हा निर्णय का घेतला आणि कोणत्याही दबावामुळे त्याने असे केले का, हे समजून घेण्याचा प्रयत्न करणेही महत्त्वाचे आहे. मग त्यावर निर्णय अथवा प्रतिक्रिया दिल्यास फायद्याचे ठरू शकते.