पुणे : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली असून गंभीर आरोप करणाऱ्या महिलेने अश्लील फोटो पाठवल्याचे प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता सातारा पोलिसांनी एक कोटी घेत असताना संबंधित महिलेला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 2016 मध्ये काँग्रेसमध्ये असताना संबंधित महिलेला जयकुमार गोरे यांनी नग्न फोटो पाठवला होता. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता,अटक टाळण्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. पण अटक पूर्व जामीन फेटाळला गेला त्यानंतर त्यांना दहा दिवस जेलमध्ये राहावं लागलं. त्यानंतर महिलेला एक निनावी धमकीचे पत्र आल्यावर तिने पुन्हा एकदा गोरेंवर आरोप केले आहेत. मला सहा वर्षांमध्ये मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिला.मी कलेक्टर आणि पोलीस अधीक्षकांना सर्व माहिती सांगून देखील त्यांनी दखल घेतली नाही. मात्र जयकुमार गोरे यांनी त्यांच्यावर केलेले हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान संबंधित महिलेने हे प्रकरण दाबण्यासाठी तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती त्यामधील एक कोटी घेत असताना पोलिसांनी अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान पोलिसांनी महिलेला अटक का केली याबाबतची माहिती सांगितली. ते म्हणाले,अश्लील फोटोचे प्रकरण मिटवण्यासाठी आरोप करणाऱ्या महिलेने वाई येथील काँग्रेसचे कार्यकर्ते विराज शिंदे यांच्याकडे तीन कोटी रुपये जयकुमार गोरे यांनी द्यावे अशी मागणी केली होती.त्यानुसार त्यांच्यात बोलणी होऊन सुरुवातीला एक कोटी रुपये द्यायचे ठरले होते. अखेर हे पैसे घेत असताना पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.