पुणे : गेल्या काही दिवसांपासून नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केली जात असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशातच आता पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर भागामध्ये एका महिलेची तब्बल ३० लाख रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेला विदेशात जॉब देण्याचा बनाव करून तब्बल तीस लाख रुपयाचा गंडा लावण्यात आला आहे. या महिलेने जॉब साठी वेगवेगळ्या वेबसाईटवर अकाउंट उघडून आपली माहिती दिली होती. याच माहितीच्या आधारे एकाने महिलेसोबत संपर्क साधला.बाहेर देशात काम असल्याचा सांगितलं त्यानंतर महिलेला रजिस्ट्रेशन फी, व्हिसा फी,जीएसटी चार्जेस अशा वेगवेगळ्या प्रकारची कारणे देऊन महिलेकडून ऑनलाईन पद्धतीने 29 लाख 97 हजार रुपये घेतले. इतकी मोठी रक्कम घेतल्यानंतर नोकरी बाबत काहीच निर्णय नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे तिच्या लक्षात आले.
या सर्व घडलेल्या प्रकारानंतर महिलेने तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर संत तुकाराम नगर पोलिसांनी दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.