पुणे : पुणे शहराची वाढती लोकसंख्या व भविष्यकाळातील पाण्याची गरज लक्षात घेता मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी कोटा मंजूर व्हावा यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. झपाट्याने विकसित होणाऱ्या पुण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांनी विधिमंडळ अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून एक पाऊल पुढे टाकणं आवश्यक आहे. पुणे शहराची तहान वाढत असल्यामुळे दरवर्षी पाण्याच्या मागणीत ही वाढ होत आहे. आता या मुळशी धरणातून पाणी कोटा मिळावा यासाठी पिंपरी चिंचवडकडूनही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे मुळशी धरणाचे पाणी कोणाकोणाला आणि कसे कसे द्यायचे याचे आव्हान राज्य सरकार समोर आहे.
पुणे शहरातील बहुतांश भाग हा खडकवासला धरणावर अवलंबून आहे. या धरणाची क्षमता 29 टीएमसीची असताना दरवर्षी पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे. सध्याची शहराची स्थिती पाहता पाण्याची मागणी कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. यामुळेच पुणे महापालिकेच्या मुख्य सभेने ऑगस्ट 2021 मध्ये मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी मिळावे असा ठराव करून तो राज्य शासनाकडे पाठवला आहे. मात्र यावर निर्णय अद्यापही झाला नसल्याने पुणेकर पाण्याच्या चिंतेत आहेत. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडचीही भविष्यातील वाढ पाहता या शहराला ही मुळशीचेच पाणी मिळावे यासाठी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे मुळशीचे पाणी कोणाला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुळशी धरण हे 18.5 टीएमसी क्षमतेचे आहे.पुणे शहरासह पीएमआरडीए च्या हद्दीत वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता आगामी तीस वर्षाचे नियोजन करणे आवश्यक आहे.त्यामुळे मुळशी धरणाची उंची एक मीटरने वाढवल्यास धरणाची क्षमता 20 टीएमसी पेक्षा जास्त होऊ शकते. मुळशी धरणातून पाणी मिळावे यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडने केलेल्या मागणीवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.