पुणे : पुण्यातील गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकात भर रस्त्यावर लघुशंका करत अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अहुजाने पोलिसांना शरण जाण्यापूर्वी केलेल्या कृत्याची माफी मागताना ‘शिंदे साहेबांची मनापासून माफी मागतो.’ असं विधान केल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता या अहुजा प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे.
याप्रकरणी आता आपचे नेते विजय कुंभार यांनी ट्विट करत शिंदेंवर तोफ डागली आहे. गौरव आहुजा हा फक्त देशाची, जनतेची माफी मागत नाहीय तर तो खासकरून शिंदे साहेबांचीही माफी मागत आहे. हे शिंदे साहेब नेमके कोण, त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे का, या शिंदे साहेबांनी आहुजाला वाचवण्यासाठी कोणती महत्त्वाची भूमिका बजावली आहे का, या प्रकरणात एखाद्या मोठ्या व्यक्तीचा हस्तक्षेप आहे का असं अनेक प्रश्न नेते कुंभार यांनी ट्विट करत उपस्थित केले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या या प्रकरणामुळे अडचणी वाढणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणारा गौरव अहुजा हा मनोज अहुजा यांचा मुलगा आहे. दोन्ही पिता-पुत्रांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे. या अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजावर जुगाराचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान त्याने केलेल्या या कालच्या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. यावर बोलताना आपच्या नेत्याने तीव्र संताप व्यक्त करत आहुजाने माफीनाम्यात “शिंदे साहेबांचे” नाव घेतले? असा सवाल उपस्थित करत “शिंदे साहेब” आणि गौरव आहुजामधील नक्की काय संबंध आहे ते बाहेर आलं पाहिजे! अशी मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.