पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी दत्ता गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू असून यातून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता आरोपी दत्तात्रय गाडे यांच्या पत्नीने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. माझा नवरा शेतीमाल विकण्यासाठी बाजारात गेला होता आणि घरी येण्यासाठी तो स्वारगेट येथील बस आगारात थांबला होता. जे काही झालं ते संमतीने झालं आहे,आमचा कायदा सुव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.त्यामुळे जे सत्य आहे ते पोलिसांनी समोर आणावं अशी मागणी आरोपीच्या पत्नीनं केली आहे.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडल्याने पुण्यासह राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या अत्याचाराच्या घटनेनंतर या प्रकरणातील आरोपी फरार झाला होता. गुणाट गावातून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून या चौकशीत अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. दरम्यानपीडित मुलीचा जो वैद्यकीय अहवाल समोर आला, त्यातून पीडितेवर दोनदा अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान याआधी आरोपीच्या वकिलांनी हा अत्याचार नसून दोघांच्याही संमतीने संबंध प्रस्थापित झाल्याचा दावा केला होता.
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे यांच्या पत्नीने काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तरुणीने आरडाओरडा का केली नाही? तिचे कपडे फाटले आहेत का? तिच्या अंगावर काही ओरबडलेलं दिसत आहे का? असं म्हटलं आहे.दरम्यान अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी दत्तात्रय गाडे यांचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. त्यानंतर त्याची ससून रुग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्याची माहिती समोर आली असताना आता गाडे याची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान आरोपी विरोधात पोलिसांना सबळ पुरावे देखील मिळाले आहेत.