पुणे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सॲपवर आल्याने खळबळ उडाली आहे. या धमकी प्रकरणानंतर पोलीस यंत्रणा आता अलर्ट झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासास सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज हा पाकिस्तानी नंबर वरून आल्याचे सांगण्यात येत आहे.. धमकीचा मेसेज करणाऱ्याचं नाव मालिक शहाबाज हुमायून राजा देव असं सांगितलं जात आहे. मात्र आता पोलिसांकडून तपास सुरू असून धमकीचा मेसेज पाठवणारी व्यक्ती ही व्यक्ती नेमकं कुठली आहे? भारतातील आहे की भारताच्या बाहेरील आहे? याचाही तपास आता पोलीस करत आहेत. दरम्यान या मेसेजनंतर आता गुप्तचर यंत्रणा देखील अलर्ट झाल्या आहेत.
दरम्यान यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय वाहन बॉम्बने उडवून दिले जाईल अशी धमकी मिळाली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी आल्याने मुख्यमंत्री कार्यालय आणि मुंबईतील इतर संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे पावले उचलण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी नंबर वरून धमकीचा मेसेज आल्यामुळे यामध्ये काही कट आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.आता याचाही शोध पोलिसांकडून घेतला जाणार आहे.