पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना एकाच वेळी मोठा धक्का दिला होता. त्यांनी एमएसआरटीसी च्या अध्यक्षपदावर IAS अधिकारी संजय सेठी यांची नियुक्ती केली होती. मात्र शुक्रवारी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी अचानक सूत्रे फिरवली आणि एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा निर्णय मागे घेतला. त्यामुळे आता पुन्हा एकदा MSRTC चं अध्यक्षपद परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी कमी होण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद 2014 पासून परिवहन मंत्र्यांकडेच होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटातील मंत्रीपदाची नाराजी दूर करण्यासाठी एसटी महामंडळाचे अध्यक्षपद भरत गोगावले यांना देण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान भरत गोगावले यांच्याकडे सध्या रोजगार हमी विभागाचे मंत्रीपद आले असल्यामुळे एसटी महामंडळाचं अध्यक्ष पद शिंदे गटाच्या प्रताप सरनाईक यांना देण्यात आले. मात्र दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जागी आयएएस अधिकारी संजय सेठी यांची नेमणूक केली. अचानक हा निर्णय अखेर मागे घेऊन त्यांनी पुन्हा एकदा प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन मंत्री पदाचा कारभार दिला. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर केली असल्याची चर्चा ही आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर राज्यातील बस स्थानकातील जुन्या बसेस संदर्भात तसेच महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरातील निर्लेखित केलेल्या जुन्या बसेसची ताबडतोब विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. कारण, या बसेसकडे दुर्लक्ष होत असल्याने याच बसेस एकप्रकारे अवैध धंद्याचे अड्डे बनत आहेत, आणि त्यातूनच अशा घटनांना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे भविष्यात कोणत्याही बसस्थानक परिसरात अशा प्रकारच्या निर्लेखित केलेल्या बसेस उभ्या करण्यात येऊ नयेत, असे निर्देशही यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.