पुणे : स्वारगेट बसस्थानकात एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरलं. आता या प्रकरणातील पीडीतेने राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर तिने पोलिसांवर ही गंभीर आरोप केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील पीडित तरुणीने पत्रात असे म्हटले आहे की, या प्रकरणाची चौकशी सुरु झाली तेव्हा इच्छा नसताना देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली वैद्यकीय चाचणी केली आहे. त्याचबरोबर अनेक पुरुष पोलिस अधिकाऱ्यांनी देखील आपल्याकडे चौकशी केली असल्याच या तरुणीने म्हटलं आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करावी अशी मागणी देखील मी केली होती मात्र त्यांची नेमणूक करण्यास एक दिवस उशीर झाल्याचे पोलिसांनी सांगितलं. अन्यायग्रस्त मुलगी म्हणून माझ्या म्हणण्याला काहीच महत्त्व नाही का असा कायदा आहे का?असा सवाल तरुणीने उपस्थित केला आहे.
दरम्यान या प्रकरणी ऍडव्होकेट अजय मिसार यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्याबाबत आत्ताच आक्षेप घ्यायचं कारण नाही मात्र माझ्याकडे आक्षेप घेण्यासारखी माहिती आहे असं पीडित तरुणीने म्हटलं आहे.या पिडीत तरूणीने पोलिसांवरती गंभीर आरोप केले आहेत. आरोपी दत्ता गाडेने माझ्यावर दोन वेळा बलात्कार केला. तिसऱ्यांदा अनैसर्गिक बलात्काराचा प्रयत्न त्याने केला तेव्हा पूर्ण ताकदीने मी विरोध केला त्यानंतर तो पळून गेला. अनेक पुरुष पोलिस अधिकाऱ्यांना माझ्यावर अत्याचार कसा केला हे सांगायच आहे असा आरोप या तरुणीने केला आहे. माझ्या मनात बलात्कार झालेल्या अनेक घटना आल्या आणि त्यातून मी जीव वाचवणं महत्त्वाचं मानलं असा पत्रात उल्लेख पीडितेने केला असल्याची माहिती समोर आली आहे.