पुणे : पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी दत्ता गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून सुरू असलेल्या त्याच्या चौकशीतुन रोज नवनवीन खुलासे होत असतानाच आता या प्रकरणातील पिडीत तरुणीने संताप व्यक्त करत पोलिसांना जाब विचारला आहे. “माझ्या बदनामीला जबाबदार कोण ?” असा सवाल या तरुणीने केला. या प्रश्नानंतर गुन्हे शाखेचे अधिकारी देखील निरूत्तर झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, २५ फेब्रुवारी रोजी पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात पहाटे ५.३० च्या सुमारास एका २६ वर्षीय महिलेवर नराधम दत्तात्रय गाडेने अत्याचार केला. या घटनेने पुण्यासह राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.या प्रकरणाचा आरोपी दत्ता गाडेला २८ फेब्रुवारीला गुनाट गावतून रात्री उशीरा उसाच्या शेतातून अटक करण्यात आली. त्याला बारा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हे शाखेने लष्कर पोलीस ठाण्यात तीन तास कसून चौकशी केली मात्र, गाडे पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणात अनेक दावे करण्यात आले होते, त्यानंतर आता पिडितेने देखील संताप व्यक्त करत माझ्या बदनामीला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला.
या प्रकरणात अनेक दावे करण्यात येत असून असे म्हटले गेले की, संबंध दोघांच्या संमतीने झाले. कोर्टातही आरोपी गाडेच्या वकिलांनी आरोपीने पीडितेला पैसे दिल्याचे सांगितले. राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील घटना घडतेवेळी प्रतिकार झाला की नाही माहीत नाही. कारण, बसबाहेर ओरडण्याचा आवाज गेला नाही असं असंवेदनशील वक्तव्य केलं. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वातावरण चांगलंच तापलं. अखेर या सगळ्या प्रकाराला वैतागून हतबल झालेल्या पीडितेने अखेर हा प्रश्न प्रशासनाला विचारला आहे.