मुंबई : गेल्या काही दिवसांपासून धारावी पुनर्विकास प्रकल्पाची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकल्पाला स्थगिती देण्यासंदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती.मात्र सर्वोच्च न्यायालयाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्याच्या याचिकेस नकार दिला आहे. त्यामुळे आता धारावी प्रकल्पाचे काम सुरूच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असा उल्लेख असलेल्या धारावीचा पुनर्विकास केला जात आहे. त्याच्या पुनर्विकासाचे काम सुरू झाले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकही करण्यात आली असून यातून मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध झाला आहे. हीबाब कोर्टाने ही मान्य केली. मात्र या प्रकल्पाच्या स्थगितीसाठी सेक्टालिंक टेक्नोलॉजी कॉर्पोरेशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्य सरकारने हा प्रकल्प अदाणी समुहाला दिल्याबाबत त्यांनी या याचिकेत विरोध दर्शवला होता. मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आता सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सुरूच राहणार आहे.मात्र या प्रकरणाची पुढील सुनावणी मे महिन्यात होणार आहे.
या प्रकल्पासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्याने जे पुनर्विकासाचे काम सुरू आहे त्याला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली. मात्र मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने ही मागणी फेटाळून लावली आहे.