पुणे : उरुळी कांचन येथील मणिभाई देसाई कृषी विज्ञान प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय ‘कृषी वैभव’ या भव्य कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू आहे. 28 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान पुणे – सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन हद्दीतील पीएमटी बस stop च्या मागे सकाळी 9 ते रात्री 9 वाजण्याच्या सुमारास करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशानं भरविण्यात येणाऱ्या या प्रदर्शनाचं यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. शनिवारी (ता. 01) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे. नवनवीन बी-बियाणे, खते, औषधे येत आहेत. त्यांचा वापर कसा करावा, त्याचे फायदे, त्याचे होणारे परिणाम या प्रदर्शनात शेतकर्यांना पाहण्यास मिळणार आहेत. प्रदर्शनात अनेक कंपन्या व त्यांचे उत्पादन घेऊन सहभागी होत आहेत.
या प्रदर्शनात देश विदेशातील विविध नामांकित कार, ट्रकटरचे साहित्य, आदि नामंकित कंपन्यांचा समावेश आहे. याचबरोबर पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन, विविध कंपन्यांची उत्पादनं आणि शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान, नवीन अद्ययावत मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली माहिती मिळणार आहे.
आज शुक्रवारपासून शेतकरी आणि नागरिकांसाठी हे प्रदर्शन खुलं करण्यात आले असून याची सर्व तयारी पूर्ण झालीय. यामध्ये 150 पेक्षा अधिक पशु-पक्षांचा सहभाग असणार आहे. यासह शेती विषयक तज्ञांचं मार्गदर्शन, चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बी-बीयाणे खते आदींची माहिती, शासकीय योजनांची माहिती देणारे दालन, बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश असणार आहे. यासाठी भव्य असा मंडप उभारण्यात आलाय.
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. वातावरणातील बदल, पाणीटंचाई व निरनिराळे व्हायरस यामुळे शेती क्षेत्रातील बदल व संशोधन शेतकर्यांपर्यंत जाणे गरजेचे बनले आहे. हे सर्व या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. त्याशिवाय प्रदर्शनात ठिबक सिंचन, अत्याधुनिक रोपण, निरनिराळे बी-बियाणे, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, रोपण पद्धती, सोलर पंप, तुषार सिंचन, शेततळे कागद, शेडनेट, शेती अवजारे, ट्रॅक्टर, मालवाहू वाहने, फवारणी यंत्रे, तयार नर्सरी व पशुपालन व्यवसायातील विविध अवजारे, पशुखाद्य, मत्स्यपालनासाठी शेततळे, कुक्कुटपालनातील खाद्यसामग्री, शासनाच्या विविध योजना, विविध पिके व फळझाडांची नर्सरी अशा विविध घटकांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.
दरम्यान, कृषी प्रदर्शनाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा कसा होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.