पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील झालेल्या अत्याचारघटनेप्रकरणी नवनवीन खुलासे आता समोर येत आहेत. स्वारगेट सारख्या पुण्यातील मध्यवर्ती परिसरात घडलेल्या या घटनेने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. अशातच आता ज्या शिवशाही बसमध्ये ही घटना घडली त्या बसचा लॉक केलेला दरवाजा उघडला कसा याची माहिती आता समोर आली आहे. खात्यांतर्गत चौकशीत बस चालकाने बस लॉक केल्याची माहिती दिली होती. त्यानुसार बसचा एअर प्रेशर उतरल्याने कदाचित या बसचा दरवाजा उघडला गेला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण एअर प्रेशर उतरल्याने आतील दरवाजा ऑटोमॅटिक उघडतो अशी माहिती तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
शहरातील स्वारगेट आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही बस स्थानकांचा परिसर कायम गजबजलेला असतो. या गजबजलेल्या स्वारगेट स्थानकात अनेक एसटी बसेस धुळखात पडून आहेत. या घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर अनेक बसेस राजकीय कार्यकर्त्यांनी चेक केल्या. त्यानुसार धक्कादायक वस्तू जसे की दारूच्या बाटल्या आणि कंडोमच्या पाकिटांचा खच पडल्याच समोर आलं. यावरूनच हे बस स्थानक आहे की अवैध धंद्याचा अड्डा असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून केला जात आहे. दुसरीकडे या घटनेची जबाबदारी सरकारी आणि एसटी डेपो ने घ्यावी अशी मागणी देखील केली जात आहे. या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी तेरा पथके कामाला लागले आहेत. आता तरी या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे पोलिसांच्या ताब्यात येणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरातील स्वारगेट बस स्थानकात दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते.शिवाय सध्या महिला प्रवाशांची संख्या तुलनेने जास्त आहे त्याचाच फायदा हे सराईत गुन्हेगार घेत असतात. या शिवशाही बस मध्ये घडलेल्या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.