बीड : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दाखल झालेल्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या आरोपपत्रातून देशमुखांची हत्या कशी करण्यात आली त्याचे फोटो देखील समोर आले होते त्यानंतर बीडसह राज्यभरात संतापाची लाट उसळली. यानंतर आता देशमुख यांची हत्या कशी झाली याचा हादरवणारा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या अहवालात देशमुख यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचे समोर आले आहे.मारहाणीमुळे त्यांचं अंग काळे निळे पडले होते. नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण केली होती. तसेच देशमुखच्या हनुवटी,कपाळ आणि दोन्ही गालावर जखमा आहेत तसेच छाती गळ्यावर देखील जबर मारहाण त्यांना करण्यात आली.जवळपास दीड – दोन तास त्यांना मारहाण करण्यात आल्याचं यातून समोर आलं आहे.
संतोष देशमुख यांची हत्या ज्या क्रूरतेने झाली हे समोर आल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हळहळला. त्यांना झालेल्या मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर तर तीव्र संतापाची लाट उसळली आहे. जवळपास 1500 पानांच्या आरोपपत्रातील अनेक गोष्टी अजून समोर येणे बाकी आहे. नुकत्याच समोर आलेल्या धक्कादायक संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालात काय? हे जाणून घेऊया…
संतोष देशमुख यांच्या हनुवटीवर जखमांच्या खुणा
कपाळ आणि दोन्ही गालावर जखमा
पोटावर मारहाण झाल्याने जखमा
नाकातून रक्त बाहेर येऊन सुकले
छाती, गळ्यावरील समोरील उजव्या बाजूला जखमा
छातीवर उजव्या व डाव्या बाजूला तसेच बरगडीवर मारहाणीमुळे जखमा
डाव्या खांद्यावर जखमा
दंडावर, कोपऱ्यावर, मनगटावर, हाताच्या मुठीवर तसेच मधल्या बोटाला दुखापत
पोटरीवर, मांडीवर, गुडघ्यावर तसेच नरगडीवर मारहाणीच्या जखमा
मारहाणीमुळे संपूर्ण पाठीसह अंग काळे-निळे पडले
दरम्यान फोटो व्हायरल झाल्यानंतर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कोणत्यातरी वरच्या व्यक्तीचा हात असल्याशिवाय एवढं करणे शक्य नाही असं तिने म्हटले आहे.हे फोटो पाहून वैभवीच्या डोळ्यातून पाणी आले.आरोपी मारहाण करताना हसत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे.