पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी संतापाची लाट उसळली आहे. या मृत्यू प्रकरणानंतर रुग्णालयाच्या प्रशासनावर चौफेर बाजूने टीका केली जात आहे. अशातच आता धर्मादाय रुग्णालयात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या उपचारांचा प्रश्न समोर आला आहे. धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना उपचार दिले जातात की नाही हे पाहण्यासाठी धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने रुग्णालयाला भेट देऊन अहवाल शासनाला सादर केला. या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली असून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटीपेक्षा अधिक निधी वापरलाच नसल्याच स्पष्ट झाल आहे.
प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्या उत्पन्नाच्या दोन टक्के निधी निर्धन आणि अल्प उत्पन्न गटातील रुग्णांच्या उपचारासाठी राखून ठेवावा असा नियम आहे. मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने त्यांच्याकडे जमा असलेल्या या निधीतील 35 कोटी 48 कोटींचा निधी वापरला नसल्याच या अहवालातून समोर आल आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने धर्मादय रुग्णालयासाठीच्या नियमांचे पालन केले नसल्याचा ठपका समितीने ठेवला आहे. त्या अहवालानंतर शासन कोणत्या प्रकारची कार्यवाही करणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान काही दिवसापूर्वी समितीने रुग्णालयाला भेट देऊन अहवाल शासनास सादर केला होता. धर्मादाय सहआयुक्त, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे अधिकारी, जे.जे.चे अधीक्षक, विधी व न्याय विभागाचे उपसचिव आणि अवरसचिव हे सर्व चौकशी समितीत होते. या चौकशी समितीच्या अहवालातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठीचा निधी वापरला नसल्याची माहिती समोर आल्याने यावर आता सरकारची कारवाई काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिला आहे. दरम्यान या प्रकरणी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर धनंजय केळकर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नसल्याची माहिती देखील समोर आली आहे.