पुणे : लोहगाव मधील खुळेवाडी मैदानावर मानवी हाडांचा सापळा सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी पंचनामा करून हाडे पुढील तपासासाठी ससून रुग्णालयात पाठवली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, खुळेवाडी मैदानावर एका व्यक्तीचा हाडांचा सापळा आणि कवटी पडल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर मानवी व्यक्तीची सात प्रकारची हाडे आणि कवटी त्यांच्या निदर्शनास आली. त्याचबरोबर मोबाईल आणि शिवकुमार के या नावाचे आधार कार्ड त्यांना सापडले. पोलिसांनी पंचनामा करून आणि ससून रुग्णालयात पाठवली असून त्यांच्या माहितीनंतर या हाडांचा उलगडा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, सहायक आयुक्त प्रांजली सोनावणे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.