अमरावती: अमरावती जिल्ह्यातील मेळघाट जवळील चिखलदरा तालुक्यात सिमोरी गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामोरी येथे अवघ्या २२ दिवसांच्या तान्हे बाळ आजारी पडल्याने घरगुती उपाय म्हणून नातेवाईकांनी विळा तापवून ६५ वेळा बाळाच्या पोटावर डागण्या दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर बाळाची प्रकृती बिघडल्यामुळे बाळाला सध्या अमरावतीमच्या डफरीन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात सुविधांचा अभाव
अधिक माहिती अशी की, बेबी उर्फ फुलवंती राजू अधिकार या चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावच्या रहिवाशी आहेत. त्यांना २२ दिवसांचे बाळ आहे. बाळाला श्वास घेण्यात अडचण येत होती. त्यामुळे नातेवाईकांनी घरगुती उपाय म्हणून बाळाच्या पोटावर विळा गरम करून चटके दिले. या प्रकारामुळे बाळाची प्रकृती आणखी बिघडली. त्यानंतर बाळाला सिमोरीवरून हतरूच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं गेलं. मात्र तिथे सोईसुविधांचा अभाव असल्याने बाळाला हतरू येथून अचलपूरला आणि नंतर अमरावतीच्या डफरीन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. बाळाला श्वास घेण्यात अडचण येत आहे. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात सुविधा उपलब्ध नसल्याने बाळाला नागपूरला नेले जाऊ शकते.
दरम्यान, मेळघाट आरोग्य यंत्रणेवर कोट्यवधींचा खर्च होतो. मात्र कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यात आरोग्य यंत्रणेला अपयश आल्याचे दिसत आहे. रुग्णवाहिकेच्या अभावामुळे होणाऱ्या गर्भवती स्त्रियांचे मृत्यू ,अज्ञान आणि अंधश्रद्धेतून केले जाणारे घरगुती उपायआणि यातून मृत्यू होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटाच्या अतिदुर्गम परिसरातील सिमोरी गावात घडलेल्या या प्रकाराने आरोग्य व्यवस्थेचे पितळ पुन्हा एकदा उगडे पडले आहे.