पुणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षाला गळती लागली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला शहापूरमध्ये मोठा धक्का बसला आहे.शहापूरचे माजी आमदार आणि शरद पवार गटाचे पदाधिकारी असलेले पांडुरंग बरोरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत अनेक नेते व पदाधिकारी यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती. अखेर पांडुरंग बरोरा यांनी तुतारीची साथ सोडली आहे आणि आपल्या हातात कमळ धरले आहे. त्यांच्या या पक्ष प्रवेशाने शहापूरमध्ये भाजपची ताकद निश्चितच वाढली आहे. पांडुरंग बरोरा यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते.त्यांचे वडील महादू बरोरा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते.पांडुरंग बरोरा हे पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते आमदार म्हणून निवडून आले होते. आमदार असताना त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता ते शिवसेना शिंदे गटात दाखल झाले होते. पुढे शिंदे गटातून त्यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश केला. मात्र त्या निवडणुकीत थोडक्या मताने त्यांना पराभवाला समोर जावं लागलं. त्यानंतर अखेर आज त्यांनी शरद पवार गटाची साथ सोडून भाजपात प्रवेश केला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. सत्ताधारी महायुतीकडून महाविकास आघाडीतील अनेक मोहरे गळाला लावले जात आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच महाविकास आघाडीला मोठा फटका बसत आहे.