बीड : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धागेदोरे सीआयडी आणि एसआयटीच्या तपासातून समोर येत आहेत. या प्रकरणाबाबत अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. आरोपी सुदर्शन घुले यांने देखील संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केली असल्याची कबुली दिली. त्यानंतर आता देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्कार्पिओ वाहनाचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सरपंच संदेश देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या स्कार्पिओ वाहनांचा फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल समोर आला असून तब्बल 19 पुरावे या स्कॉर्पिओमध्ये सापडले आहेत. यामध्ये कारच्या काचावर असलेले ठसे हे आरोपी सुधीर सांगळे याचे असल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच ही गाडी आरोपी सुदर्शन घुले याची असल्याची माहिती समोर आली आहे. वाहनावरील ठसे आणि इतर गोष्टी महत्त्वाच्या ठरणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट सांगितलं आहे.
या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले यांन पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केली असल्याची कबुली दिली आहे. अवादा कंपनीकडून मिळणाऱ्या खंडणीत सरपंच अडथळा ठरत होते. त्या दिवशी मित्राचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी आम्हाला मारहाण केली तसेच अपमानही केला.देशमुख यांनी मारहाणीचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आम्हाला चॅलेंज दिले होते,या गोष्टीचा आम्हाला राग आला होता त्यामुळे अपहरण करून त्यांची हत्या केली असल्याची कबुली सुदर्शन घुले यांनी दिली. या कबुलीनंतर आता बीडचा आका म्हणून कुख्यात झालेल्या वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा रंगली आहे.