पुणे : अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. बालशिवाजींची, सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती आणि या नगरीच्या ग्रामदैवतांची प्रतिमा यांचा समावेश असलेले वैशिष्ट्यपूर्ण स्मृतिचिन्ह आणि त्याचबरोबर दोन लाख रूपये रोख रकमेची थैली असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यंदा पुण्यभूषण पुरस्काराचे 37 वे वर्ष आहे. ज्येष्ठ अर्थतज्ञ विजय केळकर यांना यंदाचा पुरस्कार देण्याचा निर्णय ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने घेतला आहे. लवकरच होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात पुण्यभूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्याचवेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना आणि वीरमातेलाही गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी दिली आहे.
विजय एल. केळकर सध्या फोरम ऑफ फेडरेशन्स, ओटावा आणि इंडिया डेव्हलपमेंट फाऊंडेशन, नवी दिल्लीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा एक सामाजिक उपक्रम असलेल्या जनवाणीचे अध्यक्ष आहेत . अर्थशास्त्रीय क्षेत्रात त्यांची असलेली उल्लेखनीय कामगिरी यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.