पुणे : पुण्यातील जीबीएस रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे हा आजार पसरला असल्याच समोर आले आहे. याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेल्या उपाययोजनाबाबत राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने विचारणा केली आहे. या वाढत्या उद्रेकामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका चांगलीच अडचणीत आली आहे. या दोन्ही महापालिकांना आता एनजीटीने नोटीस बजावली असून चार आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे.
गेल्या काही दिवसापासून या जीबीएस उद्रेकामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा जीबीएसचा उद्रेक दूषित पाण्यामुळे झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. त्यामुळे जीबीएसग्रस्त भागातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचा पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महापालिकांना निर्देश द्यावा, अशी मागणी करणारी याचिका विधीच्या विद्यार्थ्यांनी एनजीटीकडे केली आहे. त्यानुसार आता दोन्ही महापालिकांना नोटीस बजावण्यात आली आहे. या याचिकेत तातडीने दूषित पाण्याचे स्रोत स्वच्छ करून तातडीने स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.. या तत्त्वानुसार दोन्ही महापालिकांना जीबीएस उद्रेकाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल दंड करावा, असेही याचिकेत म्हटले आहे. आता या नोटिसांना महापालिका काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान याचिकेत मांडण्यात आलेले मुद्दे योग्य आहेत का आणि जीबीएसचा उद्रेक रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, याबाबत चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश एनजीटी ने दोन्ही महापालिकांना दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी १६ एप्रिलला होणार आहे.