पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.हत्या, अत्याचार,लूटमार,खंडणी,फसवणूक अशा बऱ्याच घटना आता समोर येत आहेत. अशातच आता पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका व्यावसायिकाला दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील व्यावसायिक गौरव प्रमोद दुगड यांना त्याच्या कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन ही खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी हा कट उधळून लावा.अमित दत्तात्रय थोपटे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने दुगड यांच्या वडिलांच्या मोबाईलमधून अश्लील मेसेज स्वत:च्या मोबाईवर पाठवले. तसेच याचे स्क्रिनशॉट काढून दुगड यांना पाठवले.हे स्क्रिनशॉट व्हायरल करणार असे सांगत कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी दिल्यानंतर त्याने १० लाख रूपयांची खंडणीही मागितली. या प्रकरणाची तक्रार गौरव प्रमोद दुगड यांनी पोलीस ठाण्यात केली.
दरम्यान या प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी डमी व्यक्ती आणि चलनी नोटांची व्यवस्था करून आरोपीला पैसे जमा झाल्याचा खोटा मेसेज पाठवला. त्यानंतर आरोपी पैसे घेण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी पोहचताच बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. आरोपीने खंडणी मागितल्याची कबुली दिल्यानंतर या प्रकरणात न्यायालयाने त्याला 31 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.