पुणे : एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासन केंद्रीयअधिनियमान्वये तयार केलेल्या नियम व आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या दोन महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या नियुक्तीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यावरून महायुतीत ठिणगी पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात असतानाच मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षपदाचा निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर आता एसटी महामंडळावर अधिकृतपणे परिवहनमंत्री प्रताप सरनाईकच राहणार असल्याचा शिक्कामोर्तब झाला आहे.
एकीकडे एसटी महामंडळाची आर्थिक कोंडी सुरू असल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असताना आता एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रताप सरनाईक हे निकटवर्तीय आहेत.