पुणे : स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या घटनेनंतर आवारात पोलिसांच्या गाड्या आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मात्र पोलिसांचे गस्त असून देखील शनिवारी पहाटे एका प्रवाशाच्या पिशवीतून लॅपटॉप चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत एकाने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे,त्यांने दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार तरुण सेनापती बापट रस्त्यावरील एका खासगी कंपनीला कामाला होता.शनिवारी पहाटेच्या सुमारास गावी जाण्यासाठी ते पत्नी आणि मुलांसोबत स्वारगेट एसटी स्थानकात आले. बसमधील सामान ठेवण्याच्या जाळीत त्यांनी लॅपटॉप असलेली पिशवी ठेवली होती.बस सुरू होण्यापूर्वी त्यांनी सामानाची तपासणी केली तेव्हा लॅपटॉप ठेवलेली पिशवी चोरट्याने नेल्याची घटना उघडकीस आली त्यानंतर त्यांनी पोलिसाकडे तक्रार दिली. याप्रकरणी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात गुन्हेगारांचे दिवसेंदिवस प्रमाण वाढत चालले आहे. स्वारगेट बस आगारात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने आगार परिसरात पोलिसांनी गस्त वाढवली होती.आवारात पोलिसांची गाडी तसेच कर्मचारी तैनात आहेत बंदोबस्त तैनात असताना शनिवारी प्रवाशाकडील लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांची गस्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.