पुणे : स्वारगेट बस स्थानकावर प्रवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता पुणे महानगर परिवहन मंडळ ऍक्टिव्ह मोडवर आले असून महिलांच्या सुरक्षितेसाठी त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या पीएमपी बसमधून प्रवास करताना टवाळखोरांकडून महिला, विद्यार्थिंनी यांना त्रास दिला गेल्यास बस थेट जवळच्या पोलिस ठाण्यात नेऊन टवाळखोराविरोधात तक्रार दाखल करण्याच्या सूचना पीएमपी प्रशासनाने सर्व वाहक चालकांना दिल्या आहेत.
स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बस मध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झालेल्याच्या घटनेनंतर पुण्यासह राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता पीएमपी प्रशासनाने महिला सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना राबवण्याचा आदेश दिला आहे. महिला प्रवाशांना अधिक सुरक्षित वाटावे, त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा यासाठी पीएमपीच्या वाहतूक विभागाने विविध निर्णय घेतले आहेत. यामध्ये सर्व चालक, वाहक, गॅरेज सुपरवायझर, टाइमकीपर आणि आगार व्यवस्थापकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. बस मध्ये प्रवास करतेवेळी टवाळखोराकडून त्रास दिला गेल्यास पीएमपीचा अपघात विभाग आणि पोलिस नियंत्रण कक्षाला कळवा, अशी सूचना पीएमपी प्रशासनाने सर्व वाहक व चालकांना दिली आहे.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आगार व्यवस्थापकांनी आगारामध्ये व अखत्यारीतील बस स्थानाकांवर महिला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशा सूचना पुणे महानगर परिवहन मंडळाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.