अक्षय टेमगिरे
शिरूर : शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर आदेशानुसार गावात जाणारा रस्ता खुला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही ग्रामस्थांनी या कामास तीव्र विरोध दर्शवला आणि सरकारी कामात आत्महत्येची धमकी देत अडथळा निर्माण केला होता.याबाबत मंडल अधिकारी माधुरी बागले (वय ४४ वर्ष )यांनी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मंडल अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार, ११ जुलै २०२४ रोजी तहसीलदारांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, २५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता ग्राममहसुल अधिकारी अनुजा घुगे, ग्राममहसुल सेवक प्रिती नानेकर, ग्राममहसुल अधिकारी रामदास आरदवाड, आदी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी जेसीबी मशीनसह संबंधित जागेवर पोहोचले.
तेव्हा पार्वतीबाई बबन उकिर्ड व त्यांच्या दोन्ही मुलांनी तसेच सुनांनी रस्ता खुला करण्यास आक्षेप घेतला. त्यांनी जेसीबी मशीनसमोर अडथळा निर्माण करत बकेटमध्ये बसून काम थांबवण्याचा प्रयत्न केला. शिवाय, “जर रस्ता खुला केला, तर आम्ही अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करू,” अशी धमकी दिली.
या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल संबंधितांविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात कायदेशीर कारवाईसाठी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास टाकळी हाजी औटपोस्टचे पोलीस अंमलदार शरद वारे हे करीत आहेत.
शेतकऱ्यांसाठी रस्ता खुला करत असताना न्यायप्रविष्ठ बाब नसताना जर कुणी तो अडवण्याचा प्रयत्न केला तर अशाच प्रकारची कडक कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील. शेतकऱ्यांना शेत जमिनीत जाण्यासाठी रस्ता हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. अनेक शेतकऱ्यांना रस्ता नसल्यामुळे आपला शेतमाल त्यामुळे बाजारपेठेत नेता येत नाही. शिरूर तहसीलदार कार्यालयाकडे याबाबत अर्ज करून रस्ता मिळवता येतो. असे शिरूर तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी स्पष्ट केले आहे.