लोणी काळभोर : एक दोन नव्हे तब्बल 18 गुन्हे दाखल असलेल्या एका कुख्यात गुंडाला एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून एक वर्षांसाठी अकोला मध्यवर्ती कारागृह कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली आहे.
अभिजीत गोपीचंद दरेकर (वय ३४ रा. संभाजीनगर कदमवाक वस्ती, तालुका हवेली जिल्हा पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नावे आहे. आरोपीवर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा, हातभट्टी वाले, औषधी द्रव्य विषय गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती वगैरे यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्यासाठी अधिनियम सन 1981 चे कलम 3(2) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत दरेकर याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, गंभिर दुखापत, दंगा, हत्यारानिशी दहशत माजवणे, आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हे आहेत. तसेच आरोपी तडीपार असताना देखील तडीपार आदेशाचा भंग करुन प्रतिबंधीत क्षेत्रात येऊन गुन्हा करत होता. त्याच्यावर गंभिर स्वरुपाचे तब्बल १८ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. आरोपीवर लोणी काळभोर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करून देखील त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नव्हती.
आरोपीवर कायद्याचा वचक बसावा म्हणून लोणी काळभोर पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार करून हडपसर परिमंडळ पाचच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या माध्यमातून पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील व पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्याकडे पाठविला होता.
दरम्यान, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्थानबद्धच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन कुख्यात गुंड अभिजीत दरेकर याला एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षांसाठी अकोला कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला मोठ्या शिताफीने पकडून कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उप निरीक्षक उदय काळभोर, पोलीस हवालदार तेज भोसले, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, योगिता भोसुरे (सर्वेलन्स पथक) यांच्या पथकाने केली आहे.